Wednesday, January 4, 2012

दक्षिण दर्शन भाग १: रजनीकांतच्या गावात!

कामाच्या निमित्ताने नुकतंच बंगळूरला जाणं झालं. काही प्रेक्षणीय व ऐतिहासिक ठिकाणं पाहता आली. ऐतिहासिक वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने हा प्रवास महत्त्वाचा ठरला. त्या ऐतिहासिक ठिकाणांचं वर्णन करण्याचा हा प्रयत्न.





बंगळूर शहराची एक ओळख रजनीकांतचं गाव अशी करता येऊ शकेल! काही गोष्टी कधी कधी आपोआप घडत जातात. बंगळूरला जाईपर्यंत रजनीकांतबद्दल विशेष माहिती नव्हती. म्हणजे त्याची किर्ती (उदा., त्याने मारल्यामुळेच मृत समुद्र मृत झाला, तो टिव्हीवर आला, म्हणून विकेट पडल्या नाहीत आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला इत्यादी इत्यादी) कानांवर आलेली होतीच.. तरीसुद्धा अनेक गोष्टी नव्यानेच कळाल्या. ह्याची सुरुवात मुंबई- बंगळूर प्रवासामध्ये ‘ऐरावत’ गाडीतल्या सहप्रवाशाने लावलेल्या ‘रोबोट’ पिक्चरद्वारे झाली! ऐरावत अत्यंत दर्जेदार व्हॉल्वो गाडी असून त्यामध्ये प्रत्येक सीटवर स्वतंत्र टिव्ही आहे. सरकारी असूनसुद्धा खाजगी प्रवाशी कंपन्यांपेक्षा कित्येक पटीने दर्जेदार सेवा त्यात दिली जाते.

बंगळूर शहरामध्ये वास्तव्य मल्लेश्वरम ह्या उपनगरामध्ये होतं. इथल्या टेंपल स्ट्रीटवर कित्येक पुरातन मंदीर आहेत. ह्या परिसरात शिवाजी महाराज आले होते, असं सांगतात. दक्षिण भारतीय मंदीरं खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असतात.






भर वस्तीत अशी मंदीरं.... आधुनिक असूनही प्राचीनतेची साक्ष....




मल्लेश्वरमच्या जवळच सांकी नावाचा प्रेक्षणीय तलाव आहे. अत्यंत सुंदर व आकर्षक परिसर. सकाळी प्रभातफेरी करण्यासाठी बरेच लोक इथे येतात.


पूरब से सूर्य उगा, फैला उजियाला...... जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा.....




मनमोहक आणि स्वच्छ परिसर















त्या तलावाच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मोठा पुतळा! बंगळूरमध्ये शिवाजीनगर हे एक मोठं बसस्थानकही आहे. बालपणी शिवराय सुमारे दोन वर्ष बंगळूरमध्ये राहिले होते.





कामाच्या गडबडीत बंगळूरमधील प्रसिद्ध वास्तू बघता आल्या नाहीत; पण जुन्या विमानतळ मार्गावरील एक भव्य शिवमंदीर बघता आलं. ह्या मंदीराकडे जाताना वाटेतच इस्रोचं एक कार्यालय लागतं. शिवाय त्या परिसरात हवाईदळाचीही कार्यालयं आहेत. मंदीर पुरातन आहे. परंतु शहरीकरणामुळे मंदीराच्या आसपास इमारतींची प्रचंड दाटी झाली आहे. मंदीरात जाण्याचा व बाहेर येण्याचा मार्गसुद्धा एका मॉलला लागूनच आहे.


मुख्य मंदीराजवळ असलेलं हे एक लहान पण प्रेक्षणीय मंदीर


प्रवेशद्वाराजवळ गणेशमूर्ती!




मोकळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदीराची भव्यता उठून दिसते!

मंदीरामध्ये दर्शनाच्या मार्गावर अमरनाथवरून आलेल्या यात्रेकरूंसाठी विशेष प्रवेश आहे! मंदीर आणि शिव मूर्ती अत्यंत भव्य आहे. मागे असलेल्या खुल्या आकाशामुळे आणखी आकर्षक दिसतं. सोमवार असला तरीसुद्धा दर्शनासाठी मोठी रांग नव्हती. साग्रसंगीत पूजा आणि दर्शनविधी चालू होते. हे मंदीर म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणी आहे.

कोलार गोल्ड फिल्डला भेट:

बंगळूरमध्ये कमी वेळात विशेष काय बघण्यासारखं आहे, असं शोधत असताना कोलार गोल्ड फिल्ड (केजीएफ) ह्या जुन्या सोन्याच्या खाणीची व तिच्या पार्श्वभूमीची माहिती मिळाली. अत्यंत प्राचीन अशी ही खाण होती. अगदी रामायणापासून सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहंजोदडो संस्कृती इथपर्यंत तिचे संदर्भ मिळतात. शिवाय ह्या खाणीचं गाव हे टोकिओनंतर विद्युत पुरवठा झालेलं आशिया खंडातलं दुसरं गाव होतं! शिवाय तिथली खाण जगातल्या सर्वाधिक जुन्या आणि खोल खाणींपैकी एक होती. ब्रिटिशांचं हे आवडतं ठिकाण होतं. ही माहिती मिळाल्यानंतर ह्या खाणीला भेट द्यायची तीव्र इच्छा झाली.


नकाशा मोठा करण्यासाठी इथे क्लिक करावे.

ही खाण बंगळूरपासून पूर्वेस १०४ किमी अंतरावर आहे. कोलार ह्या बंगळूरच्या पूर्वेला असलेल्या जिल्ह्यामध्ये आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळ सीमा ह्या खाणीच्या परिसराला लागूनच आहे. बंगळूरहून कोलारमार्गे केजीएफ इथे आलो. येतानाचा महामार्ग एनएच ४ होता. म्हणजे एनएच ४ फक्त मुंबई- बंगळूर इतका नसून पुढेही आहे, हे समजलं! ह्या महामार्गावर जाताना कोलारच्या थोडं आधी हे डोंगर लागले. ह्या डोंगरांची पार्श्वभूमी ओळखीची वाटते आहे का?


ह्याच परिसरात शोलेचं चित्रीकरण झालं होतं!! घरावरची सर्जनशीलतासुद्धा विशेष वाटली. घराजवळ विशेष स्तंभ दिसतो.

कोलारला काही वेळ थांबून पुढे गेलो. कोलार हा कर्नाटकातला दूध आणि रेशीम उत्पादन ह्यामध्ये आघाडीचा जिल्हा असल्याचं समजलं. कोलारमध्ये कोलारम्मा आणि सोमेश्वर मंदीरं पाहिली. अत्यंत उच्च दर्जाची वास्तुकला व शिल्पकला होती. हंपी पद्धतीच्या ह्या मंदीरांवर तेलुगु भाषेत कोरिव काम केलेलं होतं.












मंदीराची उंची नजरेत सहजपणे मावत नाही!


अशी नारळाची झाडं इथे सगळीकडे दिसतात!








किती गहन वास्तू आहे......


तेलुगु भाषेमधील शिल्पकाम

पुढे कोलार गोल्ड फिल्डच्या परिसरात गेलो. उरूगाम, मरिकुप्पम, रॉबर्टसपेट इत्यादी गावांमध्ये ह्या खाणीचा परिसर विखुरला आहे. ही खाण २००३ मध्ये पूर्णॅत: बंद झाली. अद्यापही त्यामध्ये शेकडो टन सोनं आहे; परंतु ते ‘कमी’ आणि ‘अत्यंत कमी’ (Low and very low) प्रमाण असलेलं आहे; त्यामुळे त्याचं शुद्धीकरण करणं व ते बाहेर काढणं व्यावहारिक ठरत नाही. म्हणूनच २००३ मध्ये ही खाण बंद पडली. त्या आधी ती खाण सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारच्या मालकीची होती. ह्या परिसरात तमिळ व तेलुगु लोक बरेच आहेत. जवळजवळ सर्व पाट्या कन्नडबरोबरच तमिळमध्येही दिसत होत्या. इथे हिंदी फार कोणी बोलत नाहीत. परंतु ब्रिटिशांचं आवडतं ठिकाण असल्यामुळे इथे बरेच अँग्लो इंडियन राहत होते व त्यामुळे इंग्लिश लोक बोलतात. ख्रिश्चन प्रभावही ब-याच मोठ्या प्रमाणावर दिसत होता. स्थानिक माहिती देणारे सांगत होते, की इथे दररोज मंदीरात काही कुटुंबांकडून देवाचे फोटो ठेवलेले दिसतात; म्हणजे दररोज काही कुटुंबं धर्मांतरित होतात. इतक्या वेगाने जुनी संस्कृती बदलत आहे...... ह्या परिसरात मंदीरांपेक्षा चर्चसची संख्या जास्त आहे. केजीएफ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर दाटीवाटीच्या लहान गावासारखा आहे.


एके काळच्या भव्यतेचा एक पुरावा.....


गावामधली दोन साधी मंदीरंसुद्धा वैविध्यपूर्ण होती.




एक शाफ्ट आणि जुन्या काळात थिजून गेलेला एक ट्रक.......





फक्त मार्ग उरला.....


खाणीतून निघालेल्या अवक्षेपाचा (Residue) हा डोंगर. इथे जाण्यास अनुमती नाही.


खाणीतील एक शाफ्ट (खाली जाणारी लिफ्ट)!

केजीएफ खाण बंद पडल्यामुळे ह्या सर्व परिसरात एका मर्यादेपुढे जायला बंदी आहे. शिवाय सोन्याची खाण असल्यामुळे आणखी निर्बंध आहेत. तरीसुद्धा थोडी ओळख काढून आणि दादा- बाबा करून थोडा वेळ खाणीत जाता आलं. आतमध्ये एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं..... (जणू ज्युरासिक पार्कमध्ये आल्यासारख!) सर्वत्र गतकाळाच्या खुणा होत्या. बंद पडलेली यंत्रं, मोठी मशिनरी, खाणीची शाफ्ट, स्लरी, बंद ट्रक आणि जुने रूळसुद्धा! एक प्रकारे भूतकाळात गेल्यासारखंच वाटत होतं.


ह्या दगडामध्येही अल्प प्रमाणात अशुद्ध सोनं आहे... दगड चमकतो... दगड बाहेर नेण्यास अनुमती नव्हती.


स्लरी (शुद्धीकरण प्रक्रियेत तयार झालेला जुना गाळ)




जाने कहाँ गए वो दिन.........




ब्रिटिशकालीन क्लब


ह्या क्लबमागेच एक चर्च आहे. ब्रिटिशांचा स्वभाव भित्रा असल्यामुळे त्यांनी क्लबमधून एक भुयार चर्चपर्यंत बनवलं होतं असं म्हणतात!


ब्रिटिशांच्या काळातील वास्तुकाम ओळखू येतं...


१८९७ मधील वास्तू!

जिथे जायची परवानगी मिळाली, तो खाणीचा परिसर पाहिला. आसपासच्या भागातही फिरलो. खाणीबद्दल आणखी नवीन माहिती मिळत गेली. खाणीच्या एका टोकामध्ये मरिकुप्पम गाव आहे. हे खाणीचं रेल्वे टर्मिनस आहे. मरिकुप्पम गावची कथा मोठी रंजक आहे. रामायणामध्ये रामाने मारिच राक्षसाला मारल्याचा उल्लेख आहे. सोन्याच्या हरिणाचं रूप घेऊन तो आला असताना रामाने त्याचा वध केला. तर सोन्याच्या हरिणाच्या स्वरूपातला मारिच राक्षस जिथे मरून पडला ते गाव म्हणजे मरिकुप्पम! मारिचवरून मरिकुप्पम झालं. कदाचित त्यामुळेच इथे सोन्याचे साठे असावेत. मरिकुप्पमच्या आधी एका स्टेशनाचं नाव ऊरुगाम आहे. जे कदाचित मृगम वरून पडलं असू शकेल. म्हणजेच ह्या खाणीतल्या सोन्याच्या साठ्याचा सोन्याच्या हरिणाशी (मृगाशी) संबंध असू शकेल! हडप्पा संस्कृतीमध्ये व सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेल्या सोन्यामधील अशुद्धता इथल्या सोन्यातील अशुद्धतेशी जुळते. त्यामुळे इथलं सोनं त्या काळातसुद्धा तिथे पोचलं होतं, असं ऐकायला मिळालं. पुढेही चोल राजवंशाच्या काळात हे सोन्याचं केंद्र होतं. इतकंच काय, अगदी सोळाव्या- सतराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या विजयनगर साम्राज्यामध्ये सोनं हे ठोक व्यापाराचं चलन होतं. ही खाण त्याचा एक स्रोत होती. खाण कशी सुरू झाली, ह्याचाही संदर्भ दिला जातो. मध्ययुगीन काळापर्यंत इथे सोन्याचे साठे होते. अर्धा फूट खणलं, तरी सोनं मिळायचं. परंतु काळाच्या ओघात ते साठे संपत गेले आणि टिपू सुलतानला इथे खनन करावं लागलं. खनन करूनच खाण बनली. पुढे ब्रिटिशांनी तिचं महत्त्व ओळखलं व तिला आशियामध्ये टोकिओनंतर दुस-या क्रमांकाचं विद्युत पुरवठा असलेलं शहर बनवलं (१९०२). इथे आणलेली वीज म्हैसूरजवळून आणली होती. इतकं अंतर, हाही एक विक्रम होता! अर्थात हे करण्यामागे ब्रिटिशांचा उद्देश स्पष्ट आहे. अशी ही अद्भुत खाण......... पण २००३ नंतर इथे अस्वस्थ शांतता आहे. खाणीतील माजी कर्मचा-यांनी खाण सुरू करण्यासाठी आंदोलनं केली आहेत. आजही ती आंदोलनं थांबलेली नाहीत. इथे असलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे कदाचित एखादी शक्तीशाली बहुराष्ट्रीय कंपनी/ खाण ही खाण विकत घेण्याची दाट शक्यता आहे......

कर्नाटकाच्या धावत्या भेटीत अशा ब-याच गोष्टी बघता आल्या. दक्षिण भारत खरोखर वेगळा आहे. तिथे ब-याच प्रमाणात शिस्त व स्वत:ची वेगळी ओळख दिसते. तसंच भौगोलिकदृष्ट्या हा भाग बराच काळ सुरक्षित राहिला. दक्षिण भारत- विशेषत: कर्नाटक परकीय आक्रमकांपासून बराच काळ सुरक्षित राहिला. मुघल व सुलतान इथे येऊ शकले नाहीत आणि आले तरी बरेच उशीरा आले (कारण अर्थातच हंपीचं विजयनगर साम्राज्य!). तसंच आजच्या दक्षिण मध्य कर्नाटकला समुद्र किनारा नसल्यामुळेही त्यांना त्या मार्गाने होणा-या आक्रमणाची झळ बसली नाही. त्यामुळेच कर्नाटकातल्या वास्तु व मंदिरं ब-याच प्रमाणात मूळ स्वरूपात आणि पारंपारिक शैलीतले आहेत, असं जाणवतं.

बंगळूरमध्ये फिरताना जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांची सर्जनशीलता (Creativity)! साध्या साध्या गोष्टीमध्येही वेगळेपणा दिसत होता. घराला रंग दिलेला असतो, एखादं चित्र रेखाटलेलं असतं; पण इतकंच करून न थांबता त्यामध्ये थोडीशी मूर्तीकला असते, थ्रीडी इफेक्ट दिलेला असतो. बंगळूरमध्ये शहरातील कित्येक भिंतींवर अशीच चित्रं आहेत. अगदी राजे- महाराजेंपासून उथप्पासारख्या क्रिकेटपटूंपर्यंत! जाहिरातीमध्येही राहुल द्रविडचं पोस्टर असेल, तर तिथे त्याचा थ्रीडी चेहरा लावलेला असतो! किंवा राजकीय पुढा-यांची पोस्टर्ससुद्धा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पोस्टरमध्ये संबंधित नेता त्यांना अभिवादन करत असतानाचा फोटो! रजनीकांतचा व ह्या सर्जनशीलतेचा जवळचा संबंध असावा, असं वाटून गेलं! त्यामुळेच बंगळूरमधल्या सिटीबसमध्ये प्रवास करताना बस- कंडक्टरबद्दल एक विशेष आदर वाटायचा. न जाणो हाही पुढे जाऊन रजनीकांत बनला तर.......

दक्षिण भारतीय मंदीरं आणि केजीएफ बघितल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात. ही मंदीरं किती भव्य आहेत, किती आश्चर्यकारक आहेत! आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या दिल्लीतल्या वास्तुंप्रमाणेच ह्यांचं बांधकाम अगदी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानेसुद्धा सहजसाध्य नाही... मग प्राचीन काळी हे बांधकाम कसं व का केलं गेलं असेल? त्याशिवाय आणखी एक प्रश्न मनात उभा राहतो. आज ह्या प्राचीन वास्तुंना जतन करताना सरकारला (अधिकृत राजकीय संस्थेला) नाकीनऊ येत आहेत. एके काळी रात्रीच्या वेळी केजीएफ परिसराचा प्रकाश पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या कोलार गावात पोचत होता; ती इतकी मोठी व महत्त्वाची खाण बंद करावी लागली आहे. आज इतकी दुर्बळ सामाजिक व आर्थिक व्यवस्था आहे; तर जेव्हा प्रादेशिक राजांनी ह्या वास्तु उभ्या केल्या गेल्या; तेव्हाची सामाजिक व आर्थिक व्यवस्था किती मजबूत, भक्कम नव्हे महान असेल? इतक्या भव्य गोष्टी निर्माण केलेल्या लोकांचे वारस आपण एक एक गोष्ट बंद करण्याच्या मार्गावर कुठे जात आहोत?

अशा प्रश्नांना प्रतिकात्मक उत्तर देणारे आणि नवीन कित्येक प्रश्न जोडणारे आगळे वेगळे स्थान म्हणजे हंपी.... बंगळूरला परत जाताना हंपीचे वेध लागले. ऐतिहासिक वारसा, परंपरा, वैभवशाली गतकाळ आणि प्रगती ह्यांची अजोड प्रचिती देणारं स्थान म्हणजे हंपी..... ऐतिहासिक विजयनगर साम्राज्याची उद्ध्वस्त (न करता आलेली) परंतु अद्भुत, अजरामर आणि अतुलनीय राजधानी!





संदर्भः विकीपीडियावरील लेख

पुढील भाग: हंपी- एक अद्भुत, अजरामर, अतुलनीय, भव्य आणि रोमहर्षक नगरी.......!