Wednesday, December 9, 2009

शाश्वत विकासासाठी पाणलोट विकास . . .

शाश्वत विकासासाठी पाणलोट विकास . . .

पूर्वपीठिका:
आपले जीवन किती अस्थिर झाले आहे; हीच गोष्ट येणारा प्रत्येक दिवस सिद्ध करतो आहे. जीवनाची कोणतीही अभिव्यक्ती, परिस्थिती असू द्या, तिथे आपण निश्चित आणि निश्चिंत म्हणून एक गोष्ट धड सांगू शकत नाही. एकविसाव्या शतकात, आधुनिक युगाचा मुखवटा वागवत असताना पावलो पावली घडणार्‍या ह्या काही गोष्टीच त्याची साक्ष देतात.
प्रसंग १: दसरा, धम्मचक्रपरिवर्तनदिनाच्या आदल्या दिवशी नागपूरच्या दिशेने जाणार्‍या गाडीने केलेला प्रवास ! समाजाच्या स्थितीचं, त्यातल्या हेवेदाव्यांचं आणि संघर्षांचं रेल्वेचा प्रवास नेहमीच अप्रतिम उदाहरण देत असतो. रेल्वेमध्ये असणारे प्रथम आणि द्वितीय “वर्गाचे” डबे जणू याच संघर्षाचे साकार रूप ! दसर्‍याच्या आदल्या दिवशी नागपूरकडे जाणार्‍या नंदीग्राम एक्स्प्रेसला अक्षरश: छळछावणीचे स्वरूप आले होते. प्रत्येक स्टेशनागणिक माणसाचा अविरत लोंढा रेल्वेवर कोसळत होता. आणि ह्या लोंढ्याने सर्व व्यवस्था कोलमडून टाकल्या. झुंडशाहीचं साकार आणि अंगावर येणारं उदाहरण ! प्रत्येक स्टेशनागणिक गाडीत स्वत:ला कोंबून घेणारे लोक आणि भावनाशून्य आणि म्हणून सुखात असणारी आगगाडी.
हा प्रसंग केवळ वर्षात एकाच दिवशी असतो का ? कोणताही मोठा भावनिक कार्यक्रम, सभा, जयंती असताना हेच चित्र दिसत नाही का ? कोणत्याही प्रसंगी इतक्या झोकून देऊन जाणार्‍यांचं कौतुकच करावसं वाटतं. इतका आत्मबेभानपणा कुठे पाहायला मिळतो ? पण ह्या कौतुकाबद्दल मनात असंख्य प्रश्नही खुपसले जातात. जे हे प्रसंग असतील; ज्या जयंत्या असतील; त्यांच्या प्रवर्तकांनी जी शिकवण दिली ती महत्त्वाची का व्यक्तीपूजा आणि बेभान स्वैराचार महत्त्वाचा ? आपण जर इतक्या बुद्धीवादाच्या शिकवणी मिळूनही जर व्यक्तीपूजेत तर्र होणार असू तर कुठे तरी नक्कीच गडबड आहे. आणि ती प्रचंड भयानक आहे. संघटित होणे, संघर्ष करणे गैर नाही, आवश्यकच आहे; पण त्यातूनही जर विषमता, अन्याय, दुर्बल घटकांची पिळवणूक होणार असेल तर ? आणि इतक्या संख्येने लोक एकत्र येतात, ग्रेट, पण कशासाठी आणि कोणत्या प्रेरणेनी ? ह्यात कोणत्या दूरदर्शीपणा किंवा जागरूकतेपेक्षा परावलंबी, निराश आणि पराभूत मनोवृत्तीच जास्त दिसत नाही का ? इतक्या बेभानपणे – किंचितही नियोजन, विचार न करता झोकून देणे आणि त्यातून व्यवस्थेवर आणि पर्यायाने त्यातल्या दुर्बल घटकांवर विलक्षण ताण देणे महापुरुषांना पटत असेल का ? अर्थात हे प्रश्न वरवरच्या मरण्याबद्दल, वरवरच्या अस्थिरतेबद्दल आहेत. ह्या रोजच्या मरण्यालाही असंख्य गुंतागुंतीचे पदर आहेत.
प्रसंग २. कोणत्याही दिवशीची, कोणत्याही लाईनवरची मुंबईची लोकल. कोणत्याही कारणाने लोकल बंद पडते. असंख्य प्रवाशांचे असंख्य हाल. त्यांना काहीच मर्यादा नाहीत. ह्याला कारणीभूत कोण आणि ह्यामुळे बळी कोण ?
हे आणि असे रोजच्या जीवनातले असंख्य प्रसंग काय सांगतात ? आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनात कोणत्याच प्रकारे सामाजिक व्यवस्था आणि सेवा राहिलेल्या नाहीत. ज्या आहेत; त्या मोडकळीला आल्या आहेत; एखाद्या संहारक युद्धानंतर कोसळून पडणार्‍या सार्वजनिक सेवांप्रमाणे.
वाहतुक, सुरक्षा यंत्रणा, पायाभूत सुविधा खरं तर सरकारने द्यायला हव्यात. जागतिकीकरणाचा जमाना आला असला; तरी संविधानानुसार भारत अजूनही कल्याणकारी देश आहे. पण प्रत्यक्षात सगळं “कल्याण” झालं आहे ! कोणत्याच निकषावर सरकार ह्या जवाबदार्‍या पास होईल इतक्या पातळीवरही पूर्ण करताना दिसत नाही. कोणतीही क्षुल्लक गोष्ट होते आणि सर्व देखावा कोसळतो. आणि आपली व्यवस्थाही असंख्य ठिकाणी गुंतागुंतीची, दुबळी आणि इतकी संवेदनशील झाली आहे की ती ह्या बदलात टिकाव धरू शकत नाही. मुंबईमध्ये झालेला लोकसंख्येचा अणूस्फोट हे तसंच उदाहरण. सरकार किंवा राज्ययंत्रणा ह्या संभाव्य संवेदनशीलतेवर किंवा धोक्याच्या संभाव्यतेवर काहीच कृती करत नाही आणि ज्याची किंमत मोजतो आपण.

प्रश्नांच्या ह्या महासागरात काही उत्तरं दिसत आहेत का ? काही ठाम, स्थिर आहे की नाही ? प्रकाशाची काही बेटं आहेत का ? धुसर आणि अंधुक वातावरणात काही दिवे नक्की दिसतात. ते आहेत स्वावलंबीपणाचे. वर उल्लेखलेले प्रसंग, सर्वत्र सतत होणारे अत्याचार, अनाचार, हिंसा आणि स्वैराचार ठामपणे हेच सांगतात, सरकार, शासन नावाची यंत्रं आता बंद पडली. गेले त्यांचे दिवस. आता त्यामध्ये काही जान राहिली नाही. म्हणून त्यावर अवलंबून आशाळभूत बनण्यापेक्षा वेळ स्वत: कृतिशील होण्याची आली आहे. जितकं होता येईल, तितकं स्वयंपूर्ण होण्याची आहे. स्वत: सर्व काही करायची आहे. मग कोणतीही सेवा, सुविधा आणि गरज असेल. परावलंबीपणापेक्षा त्या प्रवासात कमी तणाव, कमी संघर्ष आहे. अशी उदाहरणं म्हणजेच स्वावलंबनाचे प्रयोग. आणि सार्वजनिक तंत्रज्ञान, जे पैसा, ऊर्जा, साधनसंपत्ती ह्यांचं खर्‍या अर्थाने विकेंद्रीकरण करेल आणि आपल्याला जास्तीत जास्त स्वावलंबी बनवेल. अशीच काही उदाहरणं म्हणजे गांधी विचार दर्शन, अण्णा हजारे, पोपटराव पवार, प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, आणि बरीच...

वर उल्लेखलेले सर्व प्रश्न आणि आजचे अन्य सामाजिक आणि आर्थिक प्रश्नही हीच गोष्टपणे दर्शवतात की, सध्याचे विकासाचे प्रतिमान संतुलित नाही. असंख्य सामाजिक आणि पर्यावरणीय असमतोलाचे प्रसंग त्यातून निर्माण होत आहेत. अनेक प्रकारे ह्या प्रतिमानातील मर्यादा समोर येत आहेत. शाश्वत विकासाच्या परिभाषेत हे प्रतिमान किंवा मॉडेल बसते का ?

शाश्वत विकासाची चौकट किंवा फ्रेमवर्क: 1. सर्व सहभागी घटकांसाठी फायदेशीर पद्धत/ मार्ग. 2. सर्व सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचा विचार सर्वांत आधी. 3. दुर्बल घटकांना अधिक महत्त्व आणि महत्त्वाचे स्थान.
4. संसाधनांचे गरजेनुसार आणि समान वाटप. 5. सर्वसमावेशक आणि सर्वांना अंतर्भूत करणारी जीवनशैली.
6. विकेंद्रित प्रकारची रचना; एकाच ठिकाणी अवलंबून राहण्याची सक्ती नाही.

ह्या प्रकारे शाश्वत विकासाची चौकट गांधीजी, मार्टीन ल्युथर ह्यांसारख्या विचारवंतांकडून सांगितली गेली आहे. आपण ह्या चौकटीची तुलना आजच्या तथाकथित “विकासा”शी केली, तर सहज समजते की हा तथाकथित “विकास” केवळ काही सामाजिक घटकांची वाढ किंवा भरभराट आहे, सर्वांची नाही. असे असल्यामुळेच अत्यंत गंभीर स्वरूपाचे सामाजिक, शारिरीक, राजकीय असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत. विकासाचे प्रतिमान किंवा पद्धत हे ह्याच्या मूळाशी आहे; त्यामुळे वरवरच्या मलमपट्टीने हे प्रश्न सुटणार किंवा संपणार नाही. हे प्रश्न सोडवून शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे जायचे असेल; तर त्यासाठी शाश्वत विकासाच्या प्रतिमानाचा वापर केला पाहिजे आणि त्या प्रकारचे बदल सर्व ठिकाणी- जीवनपद्धती, उपजीविका, सामाजिक संस्था- आदि संदर्भांत केले पाहिजेत.
शाश्वत विकासाचे म्हणून ओळखले जाणारे काही मार्ग आहेत. पाणलोट विकास हा त्या मार्गांकडे घेऊन जाणारा एक दुवा.
पाणलोट विकास – शाश्वत विकासाचा राजमार्ग

राळेगण सिद्धी, हिवरे बाजार आणि अन्य असंख्य उदाहरणांद्वारे परत परत सिद्ध झालेला हा राजमार्ग आहे. पाणलोट विकास हा केवळ ग्रामीण किंवा शेतकी विकासाचा मार्ग नाही; तर तो सर्वांगीण शाश्वत विकासाचा मार्ग आहे. आपण चर्चा केलेले सर्व प्रसंग हे आजच्या असंतुलित “विकासा”मुळे होत आहेत. शहरीकरणाचे उदाहरण घेऊ. सर्व लोक जर शहरात येत असतील; तर ही पद्धत शाश्वत कशी होणार ? अन्नधान्याची गरज कशी पूर्ण होणार; शहरातील साधने कशी पूरी पडणार ? शिवाय जास्तीच्या लोकसंख्येचा शहरावर अतिशय ताण पडणार.

ही परिस्थिती पाणलोट विकासाद्वारे टाळली जाऊ शकते. अशी कित्येक पाणलोट विकास आणि आदर्श गाव उपक्रम राबवलेली गावं आहेत; जिथे मायग्रेशन किंवा स्थलांतर थांबले आहे. ज्या गोष्टींमुळे लोक गावं सोडत होते; त्या गोष्टी त्यांना गावात मिळाल्या; तर स्थलांतरही विरुद्ध दिशेने परत जाते; असे चित्र काही गावांत पाहायला मिळते. तितकी संपन्नता आणि स्थिरता पाणलोट विकासामुळे गावांना मिळते.

पाणलोट विकास हा नैसर्गिक साधनांशी सुसंगत विकास आहे; त्यामध्ये कोणत्या मानवी किंवा नैसर्गिक साधनाची हानी होत नाही. त्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ह्या सर्व कारणांमुळे पाणलोट क्षेत्र विकास हा शब्द शाश्वत विकासाची गुरुकिल्ली झाला आहे.
पाणलोट विकासाची तत्त्वे आणि पद्धती:
पाणलोट विकास हा मुख्यत: असमान जमिनीच्या प्रदेशात केला जाणारा कार्यक्रम आहे. ग्रामीण विकासाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी हा आहे आणि सरकारी अनुदानाने लोकसहभागावर राबवला जातो. उंचावरून वाहून जाणारे पाणी दीर्घकाळासाठी अडवणे आणि ह्या पाण्याच्या सहाय्याने ग्रामीण विकासाला चालना देणे; हे मुख्य तत्त्व ह्यामध्ये आहे. त्या त्या भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीच्या स्वरूपानुसार समतल चर, लूज बोल्डर, नाला बंडिंग अशी पाणलोटाची रचना करता येते. ह्यासाठी कोणत्याही विशेष तंत्रज्ञानाची किंवा भांडवलाची गरज लागत नाही. गावात सहज उपलब्ध असणारे अकुशल मनुष्यबळ त्यासाठी पुरेसे आहे.

मर्यादा: पाणलोट विकास हा सामुहिक उपक्रम आहे; तो एका व्यक्तिला राबवता येण्यासारखा नाही. त्यासाठी आवश्यक ते बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आणि मनुष्यबळाची आवश्यकता असते. पाणलोट विकासातून अर्थार्जन आणि रोजगार निर्मिती होत असली; तरी त्याला स्वतंत्र आणि पूर्ण असा उपक्रम म्हणता येणार नाही. हा विकासाचा मार्ग आहे; प्रत्यक्ष विकासाची पद्धत नाही; पाणलोटासह विकेंद्रित आणि शाश्वत विकासाचे अन्य घटकही तितकेच आवश्यक आहेत – उदा., सेंद्रिय शेती; ग्रामोद्योग, लघु उद्योग आदि.

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!